आदर्श विद्यार्थी
in Marathi, The Bapu That I Know
- बकुळ मर्चंट
पराडकरबाई – बापूंच्या सर्वात लाडक्या शिक्षिका. शिरोडकर शाळेत नवीन शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. बापू आणि पराडकरबाई यांच्यात फक्त आठ नऊ वर्षांचच अंतर. एम.एस.सी. झालेल्या पराडकर बाई सायन्स उत्कृष्ट शिकवायच्या. पण पहिल्याच वर्षी त्यांना ७वीच्या वर्गावर म्हणजेच बापूंच्या वर्गावर भूगोलाचा विषय शिकवायला दिला गेला.
भूगोल म्हणजे बाईंचा अगदी नावडता विषय. पण नाईलाजाने शिकवणं भाग पडलं. बापू म्हणजे अगदी खोडकर. बाई वर्गात आल्या की प्रत्येक तासाला विचारायचे, ‘‘बाई, कुठला नकाशा आणू? जगाचा की भारताचा की पृथ्वीचा गोल आणू?’’ त्या गोलाचं नाव ऐकताच बाईंच्या पोटात गोळा यायचा. बापू प्रश्नही असे विचारायचे की बाई बुचकळ्यात पडायच्या. काहीतरी करून वेळ मारून न्यायच्या. पण मग टीचर्सरुममध्ये भूगोलच्या एक्सपर्ट काळेबाईंकडून त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायच्या. भूगोलाबद्दल अगदी बारकाईने विचारायच्या. काळेबाई म्हणायच्या सुद्धा, ‘‘अगं, कितवीला शिकवायचंय?’’ पराडकरबाई म्हणायच्या, ‘‘सातवीला’’. काळेबाई म्हणायच्या, ‘‘अरे, मला वाटलं अकरावीला की काय. एवढं डीटेल काय करायचंय?’’
पण पराडकर बाईंची स्थिती त्यांची त्यांनाच माहीत. पराडकर बाई भूगोलाचं खूप टेन्शन घ्यायच्या. सोमवारी आणि गुरुवारी भूगोलचा पिरिअड असायचा. त्यामुळे रविवारी आणि बुधवारी ‘‘उद्या बापू काय विचारणार’’ या टेन्शनने झोप नाही तर मंगळवारी व शुक्रवारी पुढच्या पिरियडला बापूंना काय उत्तर द्यायचं या टेन्शनने झोप नाही. काळेबाईंकडून उत्तर तयार करून पुढच्या तासाला जायच्या. उत्तर देणार इतक्यात बापू म्हणायचे, ‘‘त्या प्रश्नाचं उत्तर मला कळलं. आता दुसरी डिफकल्टी सॉल्व्ह करा.’’ बाई पुन्हा हादरायच्या. कसंबसं एक वर्ष पार पडलं. पुढच्या वर्षी मात्र बाईंनी सुपरवाईझर ए.के. गावकर सरांना सांगून टाकलं, ‘‘मला हवं तर एकही ऑफ पिरियड देऊ नका, पण भूगोल शिकवण्याची शिक्षा मात्र नको. ही वात्रट मुलं माझी भंबेरी उडवतात.’’
आता मन:सामर्थ्य देऊन टेन्शन कमी करणारे बापू लहानपणी मात्र बाईंना असं टेन्शन द्यायचे.
पराडकर बाईंच्या सेंडऑफच्या दिवशी बापू स्वत:च म्हणाले, ‘‘मला न आवडणारा भूगोल पराडकर बाईंनी छान शिकवला आणि मलाही तो छान कळला.’’
बापू सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अगदी पुढे असायचे. वक्तृत्त्व स्पर्धा असो, नाट्यप्रवेश असो, की नाटक असो, आंतरशालेय स्पर्धांमध्ये (कुमार कला केंद्र वगैरे) बापूंनी भाग घेतला म्हणजे बक्षिसं घेऊन येणारच.
एस.एस.सी. ला असताना सुद्धा पिरियड चुकवून नाटकाच्या तालमी चालायच्या. मग पराडकर बाईंनाच काळजी वाटायची. त्या कळकळीने बापूंना सांगायच्या, ‘‘अरे, आता नाटकं कमी कर. तुझा पहिला नंबर जाईल.’’ बापू म्हणायचे, ‘‘बाई, काळजी करू नका. मी अभ्यास करेन.’’ पण बाईंना काही चैन पडायचं नाही. त्या शाळेतल्या प्यूनला सांगून ठेवायच्या, ‘‘तालीम संपल्यावर बापूंना घरी जायला देऊ नकोस. टीचर्सरूममध्ये पाठव.’’ त्या बापूंना जबरदस्तीने अभ्यासाला बसवायच्या, चुकलेला अभ्यास शिकवायच्या, त्यांची तयारी करून घ्यायच्या. बाईंचे हे ॠणही बापूंनी स्वत: सर्वांना सांगितलं होतं.
काही वर्षांपूर्वी धनलक्ष्मी पूजनाला पराडकर बाई वांद्रयाला आल्या होत्या. त्यांच्या बाजूला बापूंची आई होती. आई म्हणाली, ‘‘बाई, तुम्ही बापूंना लहानपणी पोवाडा खूप छान शिकवला होता हं’’ पराडकर बाई बुुचकळ्यात. ‘‘मी कधी शिकवला पोवाडा?’’ नंतर आई म्हणाली, ‘‘बापूला मी कधी विचारलं की हे कुठे शिकलास की बापू म्हणायचा, हे मला पराडकर बाईंनी शिकवलं.’’ एम.बी.बी.एस. झाल्यावर बापू बाईंना पेढे घेऊन घरी गेले होते. धुळ्यात इंटर्नशिपसाठी पराडकर बाई भेटल्या असताना बापू म्हणाले, ‘‘बाई तुम्ही अजून मजासवाडीतच रहाता ना?’’ बाईंनी विचारलं, ‘‘अरे, तुझ्या अजून लक्षात आहे?’’ तेव्हा बापू म्हणाले, ‘‘बाई, मी चार पाच वेळा तुमच्या घरी येऊन गेलो आहे. तुमची मजासवाडी माझ्या चांगलीच लक्षात आहे.’’
असा हा शिक्षकांची भंबेरी उडवणारा, तरीही त्यांना खूप आदर देणारा, त्यांचे ॠण स्मरणारा बापू. बापू मस्ती खूप करायचे. पण त्या मस्तीला सुद्धा एक स्टॅन्डर्ड होता. त्यामुळे त्यांची मस्ती कुणाला खुपायची नाही, उलट सुखवायची.
पराडकरबाईंना बापूंच्या अस्तित्वाची जाणीव बर्याच प्रसंगी झाली आहे. आईच्या मांडीचं हाड मोडल्याने मेजर ऑपरेशन करणं भाग होतं. ७८ वर्षाच्या बाईचं साडेपाच तास चाललेलं ऑपरेशन; लोकल ऍनस्थेशिया दिला होता. पूर्ण ऑपरेशनमध्ये अतिशय को-ऑपरेशन मिळाल्याबद्दल डॉक्टरांनी आईकडे त्यांची प्रशंसा केली. आई म्हणाली, ‘‘संपूर्ण ऑपरेशनभर माझा हात हातात घेऊन शर्टपॅन्टमधला एकजण मला धीर देत होता, काही काळजी करू नका असा आश्वासक आधार देत होता. मग मी कशाला घाबरू?’’ ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी छातीला लावलेल्या बापूंच्या फोटोनेच त्यांचं ऑपरेशन सुखदपणे पार पाडलं होतं.
बाईंना अजून ही एक प्रचिती आली. बाईंच्या सेंडऑफला परबबाईंनी बापूंचा मोठा फोटो त्यांना दिला होता. माझा बापूच मला भेटायला आला म्हणून पराडकरबाई खूष झाल्या. मला स्वत: फोन करून बाईंनी कळवलं. बाईंना बापूंकडे येणं शक्य होत नसल्याने स्वत:च त्यांच्याकडे जाणारा हा बापू.
आजही शाळेची वीट न वीट आठवणीने जपणारा बापू म्हणूनच मनाला खूप भावतो.
बापू अतिशय हुशार मुलगा. वर्गात दोन मॉनिटर असायचे. एका मॉनिटरने मस्ती करणार्यांची नावे लिहीली की बापू, म्हणजे दुसर्या मॉनिटरकडून ती खोडली जायची. कारण सर्वात मस्तीखोर हाच.
बापू मॉनिटर होते तेव्हाची ही आठवण. एका मुलीला काही मस्ती केल्यावरून वर्गाबाहेर ओणवं उभं रहाण्याची शिक्षा दिली गेली होती. बापू हळूच तिच्या कानात जाऊन बोलले, ‘‘चक्कर येण्याचं नाटक कर.’’ तिने खरच चक्कर आल्याचं सोंग केलं आणि तिची शिक्षा वाचली. असा हा आपल्या मित्र मैत्रिणींचा कैवार घेणारा बापू.
परळसारख्या कामगार वस्तीतल्या आमच्या शिरोडकर शाळेत सारीच मुलं सांपत्तिक दृष्ट्या कनिष्ठ वर्गातली. बापू संपन्न घराण्यातील, जातीने उच्चवर्णाचे, दिसायला रुबाबदार, अभ्यासाबरोबरच सर्व क्षेत्रांमध्ये चमकणारे. हातात स्टीलची पेटी घेऊन गाडीतून शाळेत येणारा हा एकमेव विद्यार्थी. त्यामुळे आम्हाला सुरुवातीला थोडं दडपण यायचं.
पण बापू अतिशय निगर्वी, मनमिळावू. त्यांना त्यांच्या सुसंपन्न, खानदानी घराण्याचा गर्वही नव्हता की स्वत:च्या रुबाबाची, हुशारीची ऐटही नव्हती. त्यामुळे सर्वांनाच तो आपलसं करायचा, सार्यांना त्याचा सहवास हवाहवासा वाटायचा, सर्वांचा तो लाडका असायचा. शाळेतले प्यून, कँटीनवाला, स्टेज मॅनेजर, लायब्ररीयन, लॅब असिस्टंट, सारे शिक्षक-शिक्षिका, प्रिन्सिपल, सारे विद्यार्थी-विद्यार्थिनी सार्यांनाच तो आपला वाटायचा.
अगदी त्या गोकुळातल्या कृष्णासारखाच, सर्वांच्या खोड्या काढूनही त्यांची बाजू घेऊन भांडणारा आणि आपली बाजू नेमक्या शब्दांत सांगून सर्वांच्या गळी उतरवणारा हा बापू!
बापू आमच्याशी एका नॉर्मल मुलाप्रमाणेच नेहमी वागले. त्यामुळे त्याच्याशी खेळताना, मस्ती करताना, रुसताना, त्याच्याशी स्पर्धा करताना आपण हे सारं कुणाबरोबर करतो आहे याचं ज्ञान नव्हतं. आज बापूंचं खरं स्वरूप कळल्यानंतर मन:स्थिती थोडी विचित्र होते. का नाही त्याच्या सहवासातला प्रत्येक क्षण काळजावर कोरून ठेवला? मनात येतं, त्या बाळबापूच्या सहवासाचं भाग्य पुन्हा मिळेल का?
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Tuesday, 18 November 2014
आदर्श विद्यार्थी
Subscribe to:
Post Comments (Atom)
गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र.
गोविंद्यापीठाम उदी सेवा मुरबाड उपासना केंद्र. ।। हरी ओम ।। पुरुषार्थ मंडळाम कलश सेवा मुरबाड उपासना केंद्र. दिनांक १८/०७/२०१८, २०/...
-
http://aniruddhafriend-samirsinh.com/ambadnya-pratyaksha-anunnaki-series/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=ambadnya-pratya...
-
Dr . Aniruddha Dhairyadhar Joshi Personal Life (Fondly called as "Bapu" ) --- Birth : Tripurari Pornima, 18 November 1956 at 04...
No comments:
Post a Comment